Friday, June 3, 2016

'चला कोकण' - ध्येय आणि उद्देश्य

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ हे वर्ष ''Visit Maharashtra'' म्हणुन जाहीर केले आहे.

पर्यटनात आणि निसर्गसौंदर्यात कोकण हे गोव्यापेक्षाही सरस असून त्यामुळेच कोकणात पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कायापालट घडवण्यासाठी स्वतंत्र ‘कोकण पर्यटन विकास महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पर्यटन उद्योगाला चालना देण्याबरोबरच मुंबई-गोवा हायवे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावणे, सागरी किनार्‍यांचा आणि बंदरांचा विकास करून त्याद्वारे स्थानिक तब्बल १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मा. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला आणि कोकण विकासाला चालना देण्यासाठी आम्ही ''चला कोकण'' ह्या Mobile Application आणि Website माध्यमातुन आमची वैज्ञानिक जोड देत आहोत. कोकण पर्यटन संदर्भातील जवळपास सर्वच माहिती एका क्लिक सरशी पर्यटकांना उपलब्ध होईल.

ही माहिती तीन मुख्य गटात विभागली आहे. १. राहण्याची व्यवस्था, २. खाणे-पिणे, ३. प्रवास
१. Reside (राहण्यासंदर्भातील सर्व माहिती - लॉजिंग, अपार्टमेंट, ३ स्टार, ५ स्टार, ७ स्टार व साधारण हॉटेल्स)
२. Eat (नाश्ता, भोजन देणारी हॉटेल्स व रेस्तराँ, घरपोच सुविधा, तसेच इतर खाण्यापिण्या संदर्भातील महत्त्वाची केंद्रे, फळ-फळावळ, फळ प्रक्रिया, सरबत, ओले व सुके सागरी मासे इ.)
३. Travel (सर्व प्रकारची वाहनांची व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शन, सुरक्षा इ.)

''चला कोकण'' - प्रमुख ध्येय आणि उद्देश्य
१. ह्या आधुनिक माध्यमातुन अधिकाधिक देशी-विदेशी पर्यटकांना कोकणच्या नंदनवनात पर्यटन करण्याच्या दृष्टीने आकर्षित करण्यास आम्ही हातभार लावणार आहोत.
२. पर्यटनादरम्यान राहण्याची व्यवस्था, खाणे-पिणे व प्रवाससंदर्भातील अधिकाधिक माहिती पर्यटकांना सुलभपणे मिळणार असल्यामुळे त्यांचा अनुभव आनंददायी ठरेल व ते पुन्हा पुन्हा येतील.
३. ह्या माध्यमामुळे वरील तीन क्षेत्रातील सर्वच लहानमोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांना चालना मिळेल व तेथील कामगारांच्या प्रगतीलाही हातभार लागेल.
४. ह्या माध्यमामुळे वरील तीनही क्षेत्रात व त्यासंबधित इतर क्षेत्रात नवनवीन रोजगार निर्माण होतील.
५. पर्यटन उद्योगाला चालना मिळाल्यामुळे महसुल वाढुन कोकणाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लागेल.
६. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातुन देशाला परकीय चलन मिळेल.
कोकणाचा सर्वांगिण विकास!

 "कोकण" म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवरील अतिशय सुंदर, नयनरम्य परिसर लाभलेले, जैविक विविधतेच्या बाबतीत अग्रेसर, निसर्गाने भरभरून दिलेले एक अतिशय सुंदर ठिकाण.

पण अयोग्य मार्गदर्शन, केवळ स्थानिक पातळीवरील प्रयत्न, गुंतवणुकीचा अभाव, अद्ययावत सामुग्रीची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींची कमतरता अशा आणि अनेक कारणांमुळे कोकणाचा आवश्यक तो विकास होऊ शकला नाही पण या सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला ठेऊन गरजांचे योग्य त्या प्रकारे क्रम लावून कोकणातील फळ प्रक्रिया प्रकल्प, कोकणाचा पर्यटन विभाग, कोकणाची जैविक विविधता, खनिज तसेच इतर साधन संपत्ती यांच्या आधारे कोकणात मोठ्ठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते पण त्या करीता योग्य नियोजनाची तसेच मार्गदर्शनाची गरज आहे.

 कोकण विकासाला हातभार लावणे हे आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य समजतो. आमच्या डोळ्यासमोर “गोव्याला” जाणारे पर्यटक पाहून अनेकदा हेच पर्यटक “कोकणात” का थोपवून धरता येणार नाहीत, याचा अनेकदा विचार करत होतो. आमचं शिक्षण, आमच्याकडे असलेली माहिती व आम्हीमिळविलेलं ज्ञान यांचा “संगम” करून आम्ही आमच्या “कर्मभूमीला” अर्थात कोकणाला जागतिक स्तरावर घेवून जाण्याचा निर्धार करीत आहोत.  

कोकणाचा विकास केवळ आणि केवळ “पर्यटन क्षेत्र” म्हणून सुंदर पद्धतीने होवू शकतो याची आम्हाला जाणीव आहे. विकास असा झाला पाहिजे की ज्यामुळे रोजगार तर निर्माण झालेच पाहिजेत, परंतु स्थानिकांना विस्थापित करून नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको तर निसर्गाच्या प्रत्येक देणगीने मानवाच्या अंतर्मनातील नैसर्गिक ओढ तृप्त झाली पाहिजे. शिवाय माझ्या देशाला परकीय चलन सुद्धा मिळालंच पाहिजे.

महाराष्ट्रातील पर्यटक तर माझ्या कोकणात येतीलच. परंतु देशातील व विशेषतः परदेशातील पर्यटक ज्यांना निसर्गाचं सानिध्य हवं आहे. त्यांना कोकणाची साद ऐकायला गेलीच पहिजे. ती साद आम्ही ''चला कोकण'' ह्या Mobile Application आणि Website द्वारे जगाला घालणार आहोत.

विकासाकडे आशेने पाहत असलेल्या कोकणातील प्रत्येक तरुणाला ''चला कोकण'' ह्या प्रकल्पातून काही न काही फायदाच होणार आहे. समुद्राच्या लाटेवर स्वार होण्याची कोकणी तरुणाची नैसर्गिक क्षमता जागतिकीकरणाच्या लाटेवरही मात करण्यास नक्कीच सक्षम आहे हा आत्मविश्वास आम्ही त्यांना देणार आहोत.

निसर्गरम्य कोकणाचा सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि पर्यटनाचा वारसा जतन करून एक आर्थिक समृद्ध प्रदेश अशी जगाच्या नकाशावर नोंद व्हायला हवी असेल तर कोकणाचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे... ह्या एकमेव उद्देशाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.

"कोकण" म्हणजे ''स्वर्गभूमी''...
अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याचा नजराणा...!

भारताचा पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात ''कोकण'' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो.

कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महाराष्ट्राच्या भूमीवरील अतिशय सुंदर, नयनरम्य परिसर लाभलेले, जैविक विविधतेच्या बाबतीत अग्रेसर, निसर्गाने भरभरून दिलेले एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे कोकण.  नारळी-पोफळीच्या बागा, माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... नयनरम्य समुद्र किनारे, गडकिल्ले, सागरीदुर्ग... यातून खुलणारे कोकणचे सौंदर्य पाहण्याबरोबरच कोकणचा इतिहास, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आदींची अनुभूती घेण्यासारखे दुसरे सुख नाही. निसर्गाचा हा असा मुक्त वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. मराठी साहित्य आणि सिनेमा मध्ये देखील कोकणातील निसर्गाचे, संस्कृती-परंपरांचे अतिशय सुंदर वर्णन आले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.

अशा ह्या निसर्गरम्य-समृध्द कोकणचा ''केलिफोर्निया'' करण्याचे स्वप्न या भूमीतील जनतेला यापूर्वी अनेकांनी दाखविले आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. कोकणच्या विकासाला चालना व गती देण्याचा आमचाही निश्चय आहे.